चिखली (प्रतिनिधी) –
चिखली तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी शिवसेना (युवासेना) तर्फे आज तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाचे नेतृत्व शिवाजी किसनराव शिराळे पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख यांनी केले.
निवेदनात म्हटले आहे की, मौजे बोरगाव येथील अनेक भूमिहीन शेतकऱ्यांना सन 2019 पासून शासकीय जमिनीचे वाटप झालेले नाही. शासनाच्या भूमी वाटप योजनेत त्यांना हक्काचे जमिनीचे पत्र मिळाले नाही आणि त्यामुळे या कुटुंबांना शासनाची पॅशनल मदत, तसेच स्वस्त धान्याचे लाभही मिळत नाहीत. या समस्येवर तातडीने तोडगा निघावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शिवसेना युवासेना पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना सांगितले की संबंधित लाभार्थ्यांची तपासणी करून, योग्य त्या निकषांनुसार जमिनीचे मालकीहक्क त्वरित द्यावेत. तसेच, शासनाकडून मिळणाऱ्या सर्व योजना व धान्य वितरणात त्यांचा समावेश करावा. या मागणीसाठी प्रशासनाला आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून, तोपर्यंत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
युवासेनेच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, “भूमिहीन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. आम्ही सातत्याने या प्रश्नासाठी लढत आहोत. जर शासनाने वेळेत उपाययोजना केल्या नाहीत, तर तहसीलदार कार्यालयासमोर सामूहिक उपोषण सुरू करण्यात येईल आणि त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील.”
या निवेदनावेळी शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते रवींद्र काकडे, दत्तात्रय काकडे, श्रीकृष्ण बकाल, गजानन खंडागळे, रामदास काकडे, मिराबाई काकडे, भास्कर काकडे, माधवराव काकडे तसेच मौजे बोरगाव येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांनी निवेदनाची नोंद घेत, प्रकरणाची आंतरिक चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
शेवटी निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जर भूमिहीनांना न्याय मिळवून दिला गेला नाही, तर शिवसेना युवासेना आपले आंदोलन तीव्र करेल. प्रशासनाने जनतेचा आवाज ऐकला नाही, तर पुढील जबाबदारी त्यांचीच असेल, असा इशारा देत हा कार्यक्रम संपन्न झाला.
