महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून सुरू असलेला परतीचा पाऊस आता शेवटच्या टप्प्यात आहे. हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी दिलेल्या नव्या अंदाजानुसार, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये २ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबरदरम्यान तुरळक स्वरूपात पावसाचे सत्र सुरू राहील. मात्र, हा पाऊस सर्वदूर नसेल, तर काही ठिकाणी अधूनमधूनच पडेल. ७ नोव्हेंबरपासून राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पूर्णपणे थांबेल आणि हळूहळू हवामानात थंडीची चाहूल लागेल.
डख यांच्या म्हणण्यानुसार, हा पाऊस निरोप घेताना परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस होऊ शकतो. मात्र, ४ नोव्हेंबरनंतर पाऊस कमी होईल आणि थंडीची सुरुवात होईल.
५ नोव्हेंबरपासून थंडीचे पहिले वारे उत्तर महाराष्ट्रात — नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांत जाणवतील. तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, वर्धा आणि नागपूर या भागांमध्येही तापमानात घट होईल. त्यानंतर थंडीचा प्रवाह मध्य महाराष्ट्राकडे — अहमदनगर, जुन्नर, आंबेगाव, संभाजीनगर, जालना आणि परभणी या भागांत ६ नोव्हेंबरपर्यंत पोहोचेल.
७ नोव्हेंबरनंतर दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील लातूर, सोलापूर आणि सांगलीपर्यंत थंडीचा प्रभाव जाणवेल. ८ नोव्हेंबरपासून राज्यात बऱ्याच ठिकाणी सकाळच्या वेळेस धुकं आणि धुईचे वातावरण दिसेल.
शेतकऱ्यांसाठीही पंजाब डख यांनी खास सल्ला दिला आहे. ज्यांना कांदा, हरभरा किंवा गहू पेरायचा आहे, त्यांनी ५ नोव्हेंबरनंतर पेरणी सुरू करावी. ७ नोव्हेंबरनंतर पाऊस पूर्णपणे थांबेल आणि चांगले सूर्यदर्शन मिळेल. त्यामुळे या कालावधीत पेरणी करणे योग्य ठरेल. तसेच द्राक्ष बागायतदार आणि वीटभट्टी मालकांनीही आपली कामे ७ नोव्हेंबरनंतर सुरू करावीत, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
राज्यातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी ही बातमी नक्कीच दिलासादायक आहे. कारण दीर्घ पावसाळ्यानंतर आता हवामान थंड होत असून हिवाळ्याची चाहूल लागणार आहे.
