राज्य सरकारकडून विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 10 जिल्ह्यांसाठी 2264 कोटींचे रब्बी अनुदान मंजूर —
यवतमाळला सर्वाधिक 638 कोटी, बुलढाणा 610 कोटी, अकोला 323 कोटी.
एकूण 17 जिल्ह्यांसाठी आतापर्यंत 4029 कोटी रुपयांचे रब्बी अनुदान मंजूर.
मुंबई | प्रतिनिधी
राज्य सरकारने विदर्भातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील अनुदान वाढपाला आज मंजुरी दिली आहे. एकूण १० जिल्ह्यांसाठी २,२६४ कोटी रुपयांचे रब्बी अनुदान वितरणास मान्यता देण्यात आली असून, यामध्ये वर्धा जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे.
यवतमाळला सर्वाधिक ६३८ कोटी
यवतमाळ जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे ५ लाख २३ हजार ३४५ शेतकऱ्यांच्या ६.३८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ६३८ कोटी १५ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
जिल्हानिहाय अनुदान वितरण
- बुलढाणा: ६.०५ लाख हेक्टरवरील नुकसानासाठी ६१० कोटी ५७ लाख रुपये; ६.८५ लाख शेतकऱ्यांना लाभ.
- अकोला: ३.२३ लाख हेक्टरसाठी ३२३ कोटी ४९ लाख रुपये; साडेतीन लाख शेतकऱ्यांना मदत.
- अमरावती: १.८६ लाख हेक्टरवरील नुकसानासाठी १८६ कोटी ९० लाख रुपये; २.२४ लाख शेतकऱ्यांना लाभ.
- वाशिम: २.७५ लाख हेक्टरसाठी २७५ कोटी ३० लाख रुपये; २६ हजार ६१८ शेतकऱ्यांना लाभ.
- नागपूर: ९२,८१३ हेक्टरसाठी ९२ कोटी ८१ लाख रुपये; १ लाख १२,९०० शेतकऱ्यांना मदत.
- भंडारा: ९,४३५ हेक्टरसाठी ९ कोटी १३ लाख रुपये; २७,३०२ शेतकऱ्यांना मदत.
- गोंदिया: २,५६८ हेक्टरसाठी २ कोटी ५६ लाख रुपये; ६,७५५ शेतकऱ्यांना लाभ.
- चंद्रपूर: १.०३ लाख हेक्टरवरील नुकसानासाठी ११० कोटी ३० लाख रुपये; ५५,६०३ शेतकऱ्यांना मदत.
- गडचिरोली: १३,२६५ हेक्टरसाठी १३ कोटी २६ लाख रुपये; २४,९०० शेतकऱ्यांना लाभ.
अनुदान टप्प्याटप्प्याने जमा होणार
कृषी विभागाच्या माहितीनुसार, या अनुदानाची रक्कम पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल.
यापूर्वी ३० ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने ७ जिल्ह्यांसाठी १,७६५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले होते. आजच्या निर्णयानंतर एकूण १७ जिल्ह्यांसाठी ४,०२९ कोटी रुपयांचे रब्बी अनुदान मंजूर झाले आहे.
शेतकऱ्यांचा प्रतिसाद
अनेक शेतकऱ्यांनी अनुदानाबद्दल समाधान व्यक्त केले असले, तरी काहींनी मदत अपुरी असल्याची भावना व्यक्त केली आहे. बहुतांश शेतकऱ्यांना आतापर्यंत ३ ते ५ हजार रुपयांदरम्यानची मदत मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या जीआरनुसार, तीन हेक्टरपर्यंत हेक्टरी दोन हजार रुपयांचे रब्बी अनुदान देण्यात येणार आहे. पुढील टप्प्यांमध्ये उर्वरित जिल्ह्यांसाठीही निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
