वरखेडच्या जिल्हा परिषद शाळेची भरारीएनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत २७ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; गुणगौरव सोहळा उत्साहात

तालुक्यातील वरखेड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा या शाळेने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत शाळेचे तब्बल २७ विद्यार्थी पात्र ठरले. याशिवाय दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेतील मुलाखतीपर्यंत मजल मारली.

या ऐतिहासिक यशाच्या पार्श्वभूमीवर शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा विशेष गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी २७ विद्यार्थ्यांसह त्यांचे मार्गदर्शक वर्गशिक्षक शुभम बुरकुल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या पालकांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला वरखेड ग्रामपंचायत चे सरपंच विनोद कणखर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेशराव भगत, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दासा पाटील यांच्यासह भास्करराव जवंजाळ, दत्तु कणखर, गजानन कणखर, नितीन गवळी, भागवत मुंढे, संतोष खरात, सतीश सपकाळ, बंडू अंभोरे तसेच शाळा समितीचे सदस्य, शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना दासा पाटील म्हणाले की, “ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये मागे नाहीत, हे या निकालाने सिद्ध केले आहे. पहिल्या वर्गापासून शिस्तबद्ध शैक्षणिक मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची चिकाटी यामुळेच आज गुणवत्ता यादीत नाव येत आहे.” शिक्षण हेच प्रगतीचे साधन असून अशा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या अहोरात्र परिश्रमांचेही यावेळी कौतुक करण्यात आले.

Leave a Comment