सावरगाव डुकरे हादरलं! मुलानेच आई-वडिलांची कुर्‍हाडीने केली निर्दयी हत्या; स्वतःचाही घेतला जीव

चिखली (गावोगावी महाराष्ट्र न्युज):
चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे या शांत आणि साध्या गावात ५ नोव्हेंबरच्या रात्री एक भीषण घटना घडली असून, यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. कौटुंबिक वादातून किंवा मानसिक नैराश्यातून एक मुलाने स्वतःच्या आई-वडिलांची कुर्‍हाडीने निर्घृण हत्या करून स्वतःचाही जीव घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या हृदयद्रावक घटनेत वडील सुभाष डीगंबर डुकरे (७५), आई लता सुभाष डुकरे (६५) आणि मुलगा विशाल सुभाष डुकरे (४२) या तिघांचा मृत्यू झाला आहे. मृत तिघेही सावरगाव डुकरे येथील रहिवासी असून गावात वातावरण अत्यंत शोकाकुल झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक तज्ञांची टीम बोलावण्यात आली असून संपूर्ण घराला सील करण्यात आले आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहांना चिखली उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी हलविण्यात आले आहे.

या घटनेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांकडून कौटुंबिक कलह किंवा मानसिक नैराश्य हा मुद्दा तपासात असल्याचे सांगण्यात आले आहे.

घटनास्थळी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील तसेच चिखली पोलिस ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी भेट देऊन तपासाची पाहणी केली.

या भयावह घटनेने सावरगाव डुकरेसह संपूर्ण चिखली तालुका हादरून गेला आहे. गावात भीतीचं आणि दु:खाचं वातावरण पसरलं असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment