राज्यातील 21 जिल्ह्यांमधील 7,201 पेक्षा अधिक गावांमध्ये राबवण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2.0) अंतर्गत भूमिहीन कुटुंबांसाठी शेळीपालन गटवाटप ही महत्त्वाची योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना चार शेळ्या व एक बोकड असा गट 75 टक्के अनुदानावर दिला जाणार आहे.
या योजनेत एकूण खर्च 48,319 रुपये असून त्यापैकी 36,239 रुपये (75%) अनुदान स्वरूपात दिले जाणार आहे. उस्मानाबादी व संगमनेरी जातींसाठी 36,239 रुपये, तर इतर स्थानिक जातींसाठी 27,610 रुपये अनुदान निश्चित करण्यात आले आहे. शेळ्यांचा तीन वर्षांचा विमा काढणे बंधनकारक राहणार आहे.
पात्रता व अटी
या योजनेचा लाभ भूमिहीन कुटुंबातील एकाच लाभार्थ्याला दिला जाईल. विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित महिला तसेच भूमिहीन व्यक्ती पात्र ठरतील. भूमिहीन असल्याचे तहसीलदारांचे प्रमाणपत्र आवश्यक असून, विधवा/परित्यक्ता/घटस्फोटित महिलांसाठी सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. लाभार्थी किंवा कुटुंबातील सदस्यांनी यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून असा लाभ घेतलेला नसावा, अशी अट आहे.
अर्ज प्रक्रिया
इच्छुक लाभार्थ्यांनी एनडीकेएसपी (NDKSP) पोर्टलवर किंवा ‘महाविस्तार’ अॅपद्वारे ऑनलाइन अर्ज करावा लागेल. शेतकरी नसल्यास आधार क्रमांकाच्या आधारे लॉगिन करून अर्ज करता येईल. आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पूर्वसंमती मिळाल्यावरच शेळी गटाची खरेदी करता येणार आहे.
खरेदी व इतर नियम
शेळी गटाची खरेदी अहिल्यादेवी मेंढी-शेळी विकास महामंडळामार्फतच करणे बंधनकारक आहे. खरेदी प्रक्रिया समितीच्या उपस्थितीत होईल. वाहतूक व इतर अनुषंगिक खर्च लाभार्थ्याने करायचा आहे. खरेदी केलेल्या शेळ्यांचे टॅगिंग करून भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
पोकरा 2.0 अंतर्गत शेतकरी व भूमिहीन कुटुंबांसाठी विविध योजना राबवल्या जात असून, ग्रामीण भागातील रोजगार व उत्पन्नवाढीसाठी या योजना उपयुक्त ठरणार आहेत.