पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेअंतर्गत देण्यात येणारा 22 वा हप्ता आता फक्त फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांनाच वितरित करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप आपला फार्मर आयडी तयार केलेला नाही, अशा शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी काढणे अत्यावश्यक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शासनाने विसावा हप्ता वितरित करण्यापूर्वीच फार्मर आयडीवर आधारित हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत दिले होते. मात्र नंतर 20वा आणि 21वा हप्ता जुन्या पद्धतीनेच दिला गेला. आता मात्र 22वा हप्ता देताना शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन फार्मर आयडीच्या आधारे केले जाणार असून त्यासाठी स्वतंत्र केवायसीची आवश्यकता नसणार आहे.
दरम्यान, पीएम किसान योजनेत हप्ता वाढवणे किंवा इतर काही महत्त्वाचे बदल करण्याच्या चर्चा देखील सुरु आहेत. आगामी बजेटमध्ये याबाबत निर्णय येऊ शकतो. मात्र सध्यातरी 22व्या हप्त्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात राबवण्यात येणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतही लाभार्थ्यांची पात्रता पीएम किसानशी जोडलेली आहे. त्यामुळे पीएम किसानमध्ये अपात्र ठरलेले लाभार्थी नमो शेतकरी योजनेतूनही अपात्र ठरू शकतात. म्हणून दोन्ही योजनांचे लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे.
अद्याप फार्मर आयडी काढलेला नसल्यास तात्काळ तो तयार करावा, तसेच प्रक्रियेदरम्यान काही अडचणी येत असल्यास तलाठी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.