सरकारकडून तब्बल 37 लाख 44 हजार लिटर केरोसीनच्या वाटपाला मंजुरी देण्यात आली असून, प्रत्येक कुटुंबाला 3 लिटर केरोसीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक कुटुंबांना स्वयंपाकासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने तात्पुरता उपाय म्हणून केरोसीन वाटपाचा निर्णय घेतला आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे (रेशन दुकाने) हे केरोसीन वितरित करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो कुटुंबांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
सरकारने स्पष्ट केले आहे की, एलपीजी पुरवठा सुरळीत होईपर्यंत ही उपाययोजना सुरू राहू शकते. तसेच, नागरिकांनी केरोसीनचा वापर काळजीपूर्वक आणि आवश्यकतेपुरताच करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे सध्याच्या तुटवड्याच्या परिस्थितीत नागरिकांना तात्पुरता आधार मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.