नागपूरमध्ये सध्या शेतकऱ्यांचा प्रचंड संताप उफाळून आला आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख आणि राज्याचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी वर्धामार्गे नागपूरमध्ये प्रवेश करत ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना अनुदान आणि इतर अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.
मंगळवारी नागपूरमध्ये पोहोचल्यावर शेतकऱ्यांनी वर्धा रोडवर ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी वाहतुकीचा संपूर्ण ताळमेळ बिघडला आणि अनेक किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली. आंदोलकांनी “सातबारा कोरा केल्याशिवाय माघार नाही” असा निर्धार व्यक्त केला आहे.
आंदोलनाच्या ठिकाणी बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टी, महादेव जाणकर, वामनराव चटप आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर उपस्थित होते. रविकांत तुपकर यांच्या भाषणाने वातावरण तापले, त्यांनी पोलिसांच्या गोळ्या कमी पडतील पण आमच्या छात्या कमी पडणार नाहीत असे वक्तव्य करत सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
बच्चू कडू यांनी सांगितले की सरकारकडे मागील काही महिन्यांपासून निवेदनं आणि बैठकांच्या माध्यमातून मागण्या पोहोचवल्या होत्या, पण काहीच प्रतिसाद न मिळाल्याने राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांना नागपूरमध्ये एकत्र आणून त्यांनी हा महामोर्चा उभारला. “सरकार चर्चा करणार असेल तर नागपूरलाच या, आम्ही मुंबईला जाणार नाही,” असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे.
दरम्यान, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येऊन सरकार चर्चेसाठी तयार असल्याचं सांगितलं. परंतु शेतकरी नेते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आंदोलनामुळे नागपूर शहरातील अनेक भागांत पेट्रोल पुरवठा आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.
शेतकऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे कोणत्याही अटीशिवाय संपूर्ण कर्जमाफी, नियमित कर्ज फेडणाऱ्यांनाही सातबारा कोरा करणे, तसेच दुधाला आणि कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव देणे. दिव्यांग आणि निराधारांसाठी अनुदान वाढवावे, अशीही मागणी आहे.
सध्या नागपूर शेतकरी आंदोलन उफाळले असून, सरकार आणि आंदोलकांमध्ये होणाऱ्या चर्चेवर सर्वांचे लक्ष लागले आहे. या आंदोलनाचा निकाल पुढील काही तासांत लागण्याची शक्यता आहे.
