लोणीगवळी (ता. …) — डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोणीगवळी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे १ लाख २८ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान घडली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रघुनाथ तुकाराम दोडके (रा. लोणीगवळी) हे पत्नीसमवेत मुलीला भेटण्यासाठी कारंजा लाड येथे गेले होते. परत घरी आल्यानंतर त्यांच्या घराच्या दरवाज्याचा कडी-कोंडा तुटलेला दिसून आला. घरात प्रवेश करून पाहणी केली असता लोखंडी कपाटाचे लॉकर तोडलेले आढळले.
लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याची पट्टी-पाते (३० ग्रॅम), सोन्याचे कानातील झुमके (३ ग्रॅम), दोन सोन्याच्या अंगठ्या (एकूण ८ ग्रॅम) तसेच चांदीची हातातील पट्टी (१० ग्रॅम) असा एकूण अंदाजे १ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून डोणगाव पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५, ३३१ (३) व ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
परिसरात अलीकडे घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.