साखरखेर्डा (गावोगावी महाराष्ट्र) इमारत बांधकाम करण्यासाठी आलेल्या एका युवकाने सोन्याचे दागिन्यांसह रोख रक्कम अडीच लाखाची चोरी केल्याची घटना बुधवारी साखरखेर्डा पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मौजे पिंपळगाव सोनारा येथे उघडकीस आली. दरम्यान, ठाणेदार गजानन करेवाड यांनी एका तासातच आरोपीच्या मुसक्या आवळून दोन लाख अकरा हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
कैलास त्र्यंबक ठोसरे (वय ४९) व्यवसाय शेती रा. पिंपळगाव सोनारा ता. सिंदखेडराजा यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पिंपळगाव सोनारा येथे माझे घराचे बांधकाम चालू आहे. त्या घरातील कपाटात लॉकरमध्ये सोन्याचे दागिने तसेच नगदी ३९ हजार रुपये ठेवलेले होते. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता मी व माझी पत्नी शेतात सोयाबीन सोंगण्यासाठी गेलेलो असताना घरी वडील त्र्यंबक गोपाळ ठोसरे हे होते. तेव्हा घराचे बांधकामावरील मिस्त्री शे. अक्रम विश्वेश्वर उर्फ गणेश विश्वेश्वर जगताप रा. साखरखेर्डा व त्याचे सोबत तीन मजूर तौफिक करेशी, परवेजखान,
शे. मुजबर शे. मुस्ताक हे कामाला आले होते. तेव्हा ते काम करत असताना त्यांना दुपारी १ वाजता वडील त्र्यंबक गोपाळ ठोसरे यांनी त्यांना चहा करुन दिला व ते शेतातील गोठयावर गेले. तेव्हा घराचे कुलूप लावून होते. बाजूला मिस्त्री व मजूर काम करत होते. दुसऱ्या दिवशी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता झोपेतून उठल्यावर एका माणसाला पैसे द्यायचे असल्याने वडील कपाट असलेल्या रुमजवळ गेले असता त्यांना त्यांचे रुमचे खोलीचा कडी कोंडा तुटलेला व आत रुममध्ये कपाटाचे आतील लॉकर उघडे दिसले.
याबाबत पत्नी सविता कैलास ठोसरे यांना विचारणा केली असता तिने मला माहिती नाही असे सांगितले. बांधकामावरील मिस्त्री शे. अकरम रा. साखरखेर्डा यास विचारपूस केली असता त्याने मला माहित नसल्याचे सांगितले. दरम्यान, ठाणेदार गजानन करेवाड यांनी पोलिसी हिसका दाखवताच शे. अक्रम याने लग्नासाठी चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दोन लाख अकरा हजार रुपयांचा माल जप्त केला. त्याला ९ ऑक्टोबर रोजी सिंदखेडराजा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
