राज्यातील लाडकी बहीण योजना अंतर्गत नोव्हेंबर व डिसेंबर 2025 या दोन्ही महिन्यांचे हप्ते अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. दरम्यान, हे दोन्ही हप्ते एकत्रितपणे (₹3000) जमा केले जाणार असल्याच्या चर्चा आणि बातम्या समोर येत असल्या तरी प्रत्यक्षात सध्याच्या परिस्थितीत हप्ता लवकर मिळण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे.
योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सध्या अर्जांची स्क्रुटनी सुरू असून अनेक अर्ज तपासणीच्या प्रक्रियेत आहेत. त्याचबरोबर, या योजनेअंतर्गत केवायसी (KYC) प्रक्रिया 31 डिसेंबर 2025 पर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे. यामध्ये पूर्वी केवायसी केलेल्या महिला, तसेच एकल, घटस्फोटीत, परितक्त आणि अविवाहित महिलांना केवायसीसाठी अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे. काही महिलांच्या केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठीही पुन्हा संधी देण्यात आलेली आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा निधी वितरित करण्यासाठी शासनाने तरतूद केलेली असून हिवाळी अधिवेशनात सुमारे ₹6103 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र निधी उपलब्ध असूनही वितरण प्रत्यक्षात कधी होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
राज्यात सध्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे या योजनेच्या हप्ता वितरणावर मोठा परिणाम होत आहे. आधी 21 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता होती, त्यानंतर पुन्हा 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमुळे 15 जानेवारी 2026 पर्यंत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक काळात थेट लाभ हस्तांतरण (DBT) करण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी आवश्यक असते. मात्र अशा परवानगीला विरोधकांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता असल्याने आयोगाकडून तातडीची मंजुरी मिळण्याची शक्यता कमी मानली जात आहे.
या पार्श्वभूमीवर, नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते एकत्रित दिले जाणार असले तरी ते 15 जानेवारीपूर्वी मिळण्याची शक्यता जवळपास नाही. याशिवाय, न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका घेणे बंधनकारक आहे. महानगरपालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही जाहीर होण्याची शक्यता आहे.
जर 15 जानेवारीनंतर काही कालावधीचा अवकाश मिळाला तरच हप्ता वितरणाबाबत दिलासा मिळू शकतो. अन्यथा या योजनेचा हप्ता येण्यास मोठा विलंब होण्याची शक्यता असून, पुढे दोन की तीन हप्ते एकत्र मिळतील का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
सध्यातरी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर–डिसेंबर हप्ता तात्काळ वितरित होण्याची ठोस शक्यता दिसून येत नाही, अशीच स्थिती आहे.