राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरीप हंगाम 2025-26 अंतर्गत सोयाबीन, मूग, उडीद आणि धान या पिकांची हमीभावाने खरेदी करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा हमीभाव मिळावा, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने नाफेड, एनसीसीएफ आणि एनएमएल या संस्थांमार्फत नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात एकूण 18 लाख 50 हजार 700 मेट्रिक टन सोयाबीन, 33 हजार मेट्रिक टन मूग आणि 3 लाख 25 हजार 680 मेट्रिक टन उडीद खरेदी केली जाणार आहे. सोयाबीनसाठी प्रति क्विंटल 5328 रुपये हमीभाव निश्चित करण्यात आलेला आहे. या पिकांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी 30 ऑक्टोबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. तर प्रत्यक्षात हमीभावाने खरेदीची प्रक्रिया 15 नोव्हेंबर 2025 ते 15 फेब्रुवारी 2026 दरम्यान होणार आहे.
नोंदणीसाठी शेतकऱ्यांना ई-समृद्धी पोर्टल वर जाऊन फार्मर आयडीच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करावा लागेल. जर फार्मर आयडी उपलब्ध नसेल तर आधार कार्ड, बँकेचे पासबुक, सातबारा आणि नमुना आठ या कागदपत्रांच्या साहाय्यानेही नोंदणी करता येईल. यामध्ये शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आणि बँक खाते तपशील आवश्यक असणार आहेत. फार्मर आयडी असल्यास सातबारा सादर करणे वैकल्पिक राहील.
धान पिकाच्या नोंदणीसाठीही प्रक्रिया सुरू असून 31 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. यावर्षी धान नोंदणीसाठी बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे, ज्यामुळे बोगस नोंदणी टाळता येईल. शेतकऱ्यांना नोंदणी करताना स्वतः उपस्थित राहून लाइव्ह फोटो, चालू हंगामाचा सातबारा आणि बँक तपशील सादर करावे लागतील.
या योजनेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य हमीभाव मिळण्याचा फायदा होणार आहे. शासनाच्या सूचनांनुसार, पुढील काही दिवसांत ई-समृद्धी पोर्टलवर सोयाबीन, मूग आणि उडीद योजनेच्या स्कीम्स दाखवल्या जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
