संग्रामपूर : (गावोगावी महाराष्ट्र न्युज ) केळीने भरलेला ट्रक वेग नियंत्रणात न राहिल्याने टुनकी गावाजवळ शनिवारी (दि. ११) रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये निलेश देवीदासराव चव्हाण आणि बाळूभाऊ गुणवंत रायबोले (दोघेही रा. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती) यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. अपघात इतका भीषण होता की ट्रकमधील केळीचे घड आणि लोखंडी पत्रे रस्त्यावर विखुरले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले व पोलिसांना कळवले.
सोनाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसेच ट्रक चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
