काळाने घातली झडप; भीषण आगीत सात वर्षीय मुलाचा मृत्यू, धक्क्याने आजारी आईचाही अंत

एका क्षणात आनंदी कुटुंबावर काळाने झडप घातली आणि मायलेकांचे नाते कायमचे तुटले. बैलगाडीवरील तुरीच्या गंजीला लागलेल्या भीषण आगीत सात वर्षीय ओम होले याचा होरपळून मृत्यू झाला. पोटच्या लेकराच्या मृत्यूची बातमी समजताच आजारपणाने खंगलेल्या आईनेही धक्क्याने प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना २२ फेब्रुवारी रोजी हरणखेड येथे घडली.

शेतकरी संदीप होले हे सकाळी शेतात गेले होते. दुपारी ओम वडिलांना घरी बोलावण्यासाठी शेतात आला. त्यावेळी तुरीच्या पेंढ्या गोळा करून बैलगाडीवर रचण्यात आल्या होत्या. ओम त्या गंजीवर बसला होता. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास आजूबाजूचा कचरा जाळला जात असताना अचानक जोराचा वारा सुटला. पेटलेल्या कचऱ्यातील ठिणगी तुरीच्या पेंढ्यांवर पडताच आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले.

संदीप होले यांनी आरडाओरडा केला. परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत ओम गंभीररीत्या भाजला होता. त्याला तत्काळ उपचारासाठी मलकापूर येथे नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान ओमची प्राणज्योत मालवली.

ही दुर्दैवी बातमी समजताच अंथरुणाला खिळून असलेल्या आई वनिता होले (वय ३२) यांना असह्य मानसिक धक्का बसला आणि त्यांनीही अखेरचा श्वास घेतला. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी व दुपारी मायलेकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

या दुर्दैवी घटनेमुळे हरणखेडसह पंचक्रोशी सुन्न झाली आहे. प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू असून, मनात एकच प्रश्न घोळत आहे—नशिबाचा हा क्रूर खेळ का?

Leave a Comment