चिखली तालुक्यात पुन्हा एकदा शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पिंपळगाव सराई गावातील २५ वर्षीय शंकर राजेंद्र गुंड या तरुणाने गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केली.
शंकरचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून, कुटुंबावर कर्जाचे ओझे होते. सकाळी नेहमीप्रमाणे गाईचे दूध काढण्यासाठी शंकर गोठ्यात गेला. बराच वेळ झाल्यानंतरही तो परतला नाही, म्हणून वडील त्याला पहायला गेले असता त्यांचा मुलगा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला.
घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.
सदर घटनेआधी काही दिवसांपूर्वी भरोसा गावात एक शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली होती. कमी कालावधीत घडलेल्या दोन आत्महत्यांनी तालुका हादरला आहे.
या घटनांनी शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक अडचणी, शेतीतील अपयश आणि मानसिक तणाव अधोरेखित केला आहे.
सरकारने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा ग्रामीण महाराष्ट्रात अशा घटनांची पुनरावृत्ती होणारच, अशी भीती व्यक्त केली जात आहे.