बुलढाणा : चिखली शहरात आज दुपारी अक्षरशः रणांगणाचे दृश्य पाहायला मिळाले, जेव्हा दोन चिकन विक्रेत्यांच्या गटांमध्ये उग्र हाणामारी झाली. शहराच्या मध्यभागी बोत्रेप पेट्रोल पंप ते डीपी रोड या मुख्य रस्त्यावर झालेल्या या घटनेने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास अचानक आरडाओरड सुरू झाली आणि क्षणातच दोन्ही गट लाठ्या-काठ्या व दगड हातात घेऊन आमनेसामने आले. लोक पळापळ करत होते, दुकाने बंद होऊ लागली आणि काही क्षणांसाठी रस्त्यावर गोंधळ माजला.
मिळालेल्या माहितीनुसार, या भांडणाचे मूळ २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या एका लग्नसमारंभातील किरकोळ वादात आहे. त्या वेळी झालेल्या छोट्याशा बोलाचालीचे रूप आज मोठ्या संघर्षात बदलले. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक व लाठ्यांनी हल्ला केल्याने काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि दोन्ही गटांना वेगळे केले. पोलिसांच्या योग्य वेळी केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.
या प्रकरणी दोन्ही बाजूंचे तक्रारी घेऊन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. घटनास्थळी तणावाचे वातावरण असले तरी सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
या घटनेमुळे शहरभर चर्चेला उधाण आले आहे. बाजारपेठेत व सोशल मीडियावर “चिखली चिकन विक्रेते हाणामारी” हा विषय ट्रेंडिंग झाला आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईचे कौतुक केले असून, अशा प्रकारच्या घटनांवर कडक कारवाईची मागणीही केली आहे.
