चिखली (बुलढाणा): आगामी जिल्हा परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चिखली तालुका कार्यालयात . ग्रामपंचायत अंत्री खेडेकर येथील सदस्य संतोष गायकवाड यांच्या पत्नी सौ. पुष्पा संतोष गायकवाड यांनी आज आपला इच्छुक उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाकडे रीतसर सोपविला.
या अर्ज सादरीकरणावेळी चिखली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष माननीय रामभाऊ जाधव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव पडघान, विष्णूभाऊ कुळसुंदर, डॉ. सत्येंद्रजी भुसारी यांनी उपस्थित राहून पक्षाच्या वतीने अर्ज जिल्हा काँग्रेस कमिटी व प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारली.
या प्रसंगी चिखली तालुका काँग्रेस मागासवर्गीय सेलचे कार्याध्यक्ष प्रदीपभाऊ साळवे, सामाजिक चळवळीतील नेते शेषरावजी साळवे, केशवजी लोखंडे, राजेंद्रजी डोंगरदिवे, मुरलीधरजी पवार, कडूबा पवार, धीरज मोरे आणि प्रकाश काका कुटे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अर्ज दाखल केल्यानंतर संतोष गायकवाड यांनी सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेतले आणि आपल्या पत्नीच्या उमेदवारीबाबत जनतेच्या विश्वासास पात्र राहण्याचा विश्वास व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, “जनतेच्या सेवेसाठी आमची उमेदवारी आहे. विकास आणि पारदर्शक प्रशासन हेच आमचे उद्दिष्ट राहील.”
चिखली तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये या अर्ज सादरीकरणानंतर नवसंजीवनी निर्माण झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. सौ. पुष्पा संतोष गायकवाड या महिला नेतृत्वातून काँग्रेसला बळकटी मिळेल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
या निवडणुकीत महिलांचा सहभाग आणि स्थानिक नेतृत्वाचा आत्मविश्वास हे काँग्रेसच्या विजयाचे प्रमुख घटक ठरतील, अशी चर्चा सध्या तालुक्यात रंगली आहे.
