अंढेरा देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत आज सायंकाळी पुन्हा एकदा खुलेआम खून झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, असोला बुद्रुक येथील आकाश चव्हाण (वय २५) याचा अयान नावाच्या तरुणाने चाकूने वार करून निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना अंढेरा बाजारगल्लीत सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. दोघांमध्ये काही वैयक्तिक वाद असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.
घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, अंढेरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. आरोपी अयान हा सध्या फरार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली असून, त्याचा शोध सुरू आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बाजारगल्लीत लोकांची मोठी वर्दळ असताना खुलेआम झालेल्या या खुनामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांची नोंद घेतली असून, साक्षीदारांचे जबाबही नोंदवले जात आहेत.
अंढेरा परिसरात अलिकडच्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी केली आहे. पोलिस निरीक्षक यांनी सांगितले की, आरोपीला लवकरच अटक करून तपासाचा धागा उलगडण्यात येईल.
या घटनेमुळे अंढेरा परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. सध्या पोलिसांचा तपास सुरु आहे आणि पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
