साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांनी गुरुवारी रात्री टोकाच पाऊल उचलत आत्महत्या केल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात आणि पोलीस यंत्रणेत खळबळ माजली आहे. डॉक्टर मुंडे यांच्या हातावर सुसाईड नोट लिहिलेली आढळली आणि त्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावं थेट नमूद करण्यात आली आहेत.
त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे, तर पोलीस प्रशांत बनकर यांनी सतत मानसिक त्रास दिल्याचंही स्पष्टपणे लिहिलं आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांवर आता बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गोपाळ बदने यांना निलंबित करण्यात आलं असून, ते फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
डॉ. संपदा मुंडे गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांशी झालेल्या वादामुळे मोठ्या तणावाखाली होत्या. एका वैद्यकीय तपासणीच्या अहवालाबाबत झालेल्या मतभेदानंतर त्यांच्यावर विभागीय चौकशीही सुरू होती. या चौकशीदरम्यान त्यांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रार देऊन “माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करेन” असा इशाराही दिला होता. पण दुर्दैवाने, त्यांच्या या गंभीर तक्रारीकडे कोणीच लक्ष दिलं नाही.
घटनास्थळावर पोलिसांनी पोहोचल्यावर डॉक्टर मुंडे यांचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत आढळला. तपासादरम्यान त्यांच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटने सगळं प्रकरण अधिकच गंभीर झालं. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री यांनी तातडीने दखल घेत, आरोपी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास आणि न्याय मिळावा यासाठी स्वतंत्र तपास पथक नेमण्यात आलं आहे.
डॉ. मुंडे यांच्या कुटुंबीयांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, ती गेल्या काही दिवसांपासून पोलीस आणि विभागीय दबावाखाली होती. तिला एका प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचीही चर्चा घरच्यांमध्ये झाली होती. “जर हा त्रास वाढला, तर मी सुसाईड करेन” असं ती घरी वारंवार सांगायची, असं तिच्या नातेवाइकांनी स्पष्ट केलं.
सध्या दोन्ही आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल झाले असून, फरार आरोपींच्या शोधासाठी दोन विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील वैद्यकीय संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा अशी मागणी राज्यभरातून होत आहे.
ही घटना केवळ एका डॉक्टरच्या मृत्यूची नाही, तर ती प्रशासनातील निष्काळजीपणा, महिलांवरील अन्याय आणि दबावाच्या संस्कृतीवर मोठा प्रश्नचिन्ह उभं करते.
