पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील फक्त 16 वर्षांचा तरुण मीत देवरे आज देशभर चर्चेत आला आहे. एवढ्या लहान वयात त्याने तयार केलेल्या ‘डेनी बाईक’ या इलेक्ट्रिक वाहन कंपनीचे व्हॅल्युएशन तब्बल 16 कोटींवर पोहोचले आहे. साध्या घरातून आलेल्या या विद्यार्थ्याने आपल्या कल्पकतेने आणि मेहनतीने मोठमोठ्या उद्योगपतींचं लक्ष वेधलं आहे.
मीत देवरे लहानपणापासूनच इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिक्समध्ये रमलेला होता. फक्त दुसरीत असतानाच त्याने खेळण्यांपासून एक कार्यक्षम एटीएम मशीन तयार केलं होतं. त्याच्या या छोट्या प्रयोगाची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. त्या दिवसापासूनच मीतने नवकल्पनांचा मार्ग निवडला आणि आपल्या आवडीला व्यवसायात रूपांतरित केलं.
पेट्रोलच्या वाढत्या किंमती आणि प्रदूषणामुळे त्रस्त झालेला हा तरुण विद्यार्थीदेखील होता, पण त्याच वेळी त्याने उपाय शोधला — “इको-फ्रेंडली आणि परवडणारी इलेक्ट्रिक बाईक.” त्याने जुने पेट्रोल बाईकचे चेस वापरून त्यावर इलेक्ट्रिक किट बसवण्याची अनोखी पद्धत विकसित केली. यामुळे त्याची ‘डेनी बाईक’ फक्त ४० ते ५० हजार रुपयांत तयार होते आणि एका चार्जिंगमध्ये तब्बल ९० किलोमीटर धावते.
या बाईकसाठी लायसन्सची गरज नाही आणि ती १००% मेड इन इंडिया आहे. त्याच्या कंपनीचं नाव ‘डेनी’ हे त्याच्या आई-वडिलांच्या आडनावांवरून — देवरे आणि निकम — ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे या ब्रँडला एक भावनिक ओळखही मिळाली आहे.
मीत देवरेने फक्त उत्पादनच नाही तर मार्केटिंगमध्येही धमाका केला. त्याने आपल्या कल्पनेचं सादरीकरण ‘शार्क टँक इंडिया’ या प्रसिद्ध कार्यक्रमात केलं. एवढ्या लहान वयात मोठ्या उद्योगपतींसमोर आत्मविश्वासाने बोलणाऱ्या मीतने सर्वांना प्रभावित केलं. शार्क्सनी गुंतवणूक न केली तरी त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली, ज्यामुळे ‘डेनी बाईक’चं व्हॅल्युएशन थेट १६ कोटींवर पोहोचलं.
आज मीत अभ्यास आणि व्यवसाय यांचा समतोल राखत आहे. त्याने देशातील लाखो तरुणांना प्रेरणा दिली आहे की वय हे यशाचं मापदंड नसतं. योग्य कल्पना, मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर कोणीही काहीही साध्य करू शकतो. पुण्याचा हा 16 वर्षांचा तरुण आता केवळ इलेक्ट्रिक बाईक उद्योगातच नाही, तर संपूर्ण भारतीय उद्योजकतेचा चेहरा बनतोय.
