चिखली (गावोगावी महाराष्ट्र न्यूज) : चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक सर्कल आणि दोन्ही पंचायत समिती गणाच्या जागा यंदा अनुसूचित महिलांसाठी राखीव निघाल्याने स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांनी स्वतःऐवजी आपल्या पत्नींना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यातच अंत्री खेडेकर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष गायकवाड यांच्या पत्नी सौ. पुष्पाताई संतोष गायकवाड यांनी “पक्षाने संधी दिल्यास मेरा जिल्हा परिषद सर्कलची निवडणूक लढवणार आहे” असे जाहीर विधान केल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
सौ. पुष्पाताई गायकवाड यांनी गावोगावी महाराष्ट्र या न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले की, “महिलांसाठी राखीव जागा ही केवळ संधी नाही, तर जबाबदारी आहे. पक्षाने मला संधी दिल्यास समाजातील महिलांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी मी ठोस काम करण्यास तयार आहे. विकास आणि पारदर्शक कारभार हीच माझी प्राथमिकता राहील.”
या वक्तव्यानंतर मेरा बुद्रुक परिसरात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ग्रामस्तरावर महिलांचा पाठिंबा मिळत असून, अनेक तरुण कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आहेत. सौ. पुष्पाताई गायकवाड या आपल्या सौम्य स्वभावामुळे आणि सामाजिक कार्यामुळे जनतेत लोकप्रिय आहेत.
त्यांचे पती संतोष गायकवाड हे अंत्री खेडेकर ग्रामपंचायतीचे कार्यक्षम सदस्य असून, त्यांनी स्थानिक विकासासाठी सातत्याने काम केले आहे. त्यांच्या कार्याचा लाभ सौ. पुष्पाताई गायकवाड यांच्या राजकीय प्रवासालाही मिळू शकतो, असा स्थानिकांचा विश्वास आहे.
मेरा जिल्हा परिषद सर्कलमध्ये यंदा स्पर्धा रंगणार असून, अनुसूचित महिलांसाठी राखीव झालेल्या या जागांमुळे महिला नेतृत्वाला नवी दारे उघडली आहेत. ग्रामीण भागात महिला उमेदवारांचे उदय हे लोकशाहीच्या सबलीकरणाचे प्रतिक मानले जात आहे.
सौ. पुष्पाताई गायकवाड यांची अधिकृत उमेदवारी जाहीर होणे बाकी असले तरी त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण भूमिकेमुळे राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षाकडून हिरवा कंदील मिळाल्यास त्या निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहेत. पुढील काही दिवसांत मेरा सर्कलमधील राजकीय तापमान आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
