लोणवाडी (गावोगावी महाराष्ट्र न्यूज): नांदुरा-बुलढाणा मार्गावर बुधवारी पहाटे झालेल्या दुर्दैवी अपघातात फिरायला गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. लोणवाडी परिसरात सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत पांडुरंग मोतीराम गाडगे (रा. धामणगाव बढे) हे गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गाडगे हे दररोजप्रमाणे सकाळी फिरायला निघाले असता, वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला. रस्त्यांची दुरुस्ती झाल्याने वाहतुकीचा वेग वाढला आहे; मात्र काही चालक निष्काळजीपणे वाहन चालवत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू केला आहे.
