बुलढाणा (गावोगावी महाराष्ट्र न्युज):
ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा राजकारणात मोठा स्फोट झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या जिल्हाध्यक्षा आणि माजी आमदार रेखा ताई खेडेकर यांनी आपल्या पदाचा धक्कादायक राजीनामा दिला आहे. या निर्णयामुळे जिल्हाभरात प्रचंड राजकीय खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेखा ताई खेडेकर यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हाती सुपूर्त केला आहे.
आपल्या पत्रात त्यांनी नमूद केले आहे —
“वैयक्तिक कारणास्तव मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. कृपया माझा राजीनामा स्वीकारावा.”
रेखा ताईंचा हा निर्णय नेमक्या कोणत्या कारणामुळे घेतला गेला, याबाबत अधिकृत खुलासा झालेला नाही. मात्र, राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
स्थानिक स्वराज्य निवडणुका अगदी काही दिवसांवर आल्या असताना दिलेल्या या राजीनाम्यामुळे **राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)**च्या जिल्हा संघटनेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
