पीएम किसान योजनेतील लाभासाठी ई-केवायसी व आधार सीडिंग अपूर्ण; हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी तब्बल २ हजार ९८१ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप प्रलंबित असून, ३ हजार ८२७ शेतकऱ्यांचे आधार सीडिंग (DBT Enable) पूर्ण झालेले नाही, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

ई-केवायसी व आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी तात्काळ आपली ई-केवायसी, आधार सीडिंग तसेच बँक खाते DBT Enable करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते DBT Enable झालेले नाही, त्यांनी India Post Payments Bank मध्ये खाते उघडून ते आधारशी संलग्न करून DBT Enable करून घ्यावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून शेतकरी कुटुंबांना वार्षिक ६ हजार रुपये थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT) माध्यमातून दिले जातात. यासोबतच राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत आणखी ६ हजार रुपये वितरित केले जातात. त्यामुळे पात्र शेतकरी कुटुंबांना एकूण १२ हजार रुपये प्रतिवर्षी थेट खात्यात जमा होतात.

मात्र, या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी व आधार सीडिंग अनिवार्य असून प्रक्रिया अपूर्ण राहिल्यास संबंधित शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी कार्यालय किंवा ग्राम नोडल अधिकारी यांच्याशी तात्काळ संपर्क साधून आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

“कोणताही पात्र शेतकरी शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी तात्काळ आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी,” असेही त्यांनी नमूद केले आहे.

Leave a Comment