महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)च्या बसेसमधून महिलांना अर्धे तिकीट व ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देण्याच्या सवलती १ मार्चपासून थेट स्वरूपात बंद होणार आहेत. शासनाने या सवलतींचा लाभ घेण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे योजना पूर्णतः बंद होत नसल्या तरी संबंधित प्रवाशांना थेट सवलतीचा लाभ घेता येणार नाही. एनसीएमसी कार्ड असल्यासच एसटी तिकिटांवर सवलत मिळणार आहे. कार्ड नसलेल्या प्रवाशांना पूर्ण तिकीट काढावे लागणार आहे.
सध्या या कार्डसाठी अनेक अटी घालण्यात आल्या असून, ते सहज मिळेल का? तसेच अर्धे तिकीट किंवा मोफत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कार्ड काढणे व नियमित रिचार्ज करणे शक्य होईल का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
खरं तर हा निर्णय स्वागतार्ह असला तरी तो खूप आधी घ्यायला हवा होता, अशी चर्चा आहे. कारण आतापर्यंत अनेक वेळा सवलतधारक प्रवासी बसमध्ये बसून प्रवास करायचे आणि पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना उभे राहावे लागत होते. एनसीएमसी कार्डमुळे अशा प्रकारच्या गैरवापराला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आतापर्यंत सवलतीसाठी केवळ आधार कार्ड पुरेसे होते. मात्र आता एनसीएमसी कार्डशिवाय महिलांना अर्धे तिकीट आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास मिळणार नाही.
कुठे आणि कसे मिळेल एनसीएमसी कार्ड?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्व विभागीय नियंत्रकांना परिपत्रक पाठवून एनसीएमसी कार्ड बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.
हे कार्ड कोणत्याही एसटी बसस्थानकावर उपलब्ध होणार आहे.
- कार्डची किंमत: १९९ रुपये
- किमान बॅलन्स: १०० रुपये
- रिचार्ज: ५० रुपयांच्या पटीत
- कार्ड प्रकार: प्रिपेड वॉलेटसारखे
हे कार्ड थेट आधार कार्डशी जोडलेले असल्याने प्रवासादरम्यान वेगळे आधार कार्ड दाखवण्याची गरज भासणार नाही.
या योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य महिला, दिव्यांग व्यक्ती, विविध पुरस्कारप्राप्त नागरिक तसेच विशिष्ट आजारग्रस्त रुग्णांचा समावेश आहे. कार्डमध्ये सवलतीचा प्रकार, टक्केवारी व प्रवासाच्या किलोमीटरची माहिती नमूद असणार आहे.