खरीप 2025 मधील मोठ्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना रबी हंगामाकडून आशा होती. मात्र अवकाळी पावसाने पुन्हा एकदा राज्यातील शेती संकटात सापडली आहे. पूर्व विदर्भ, मराठवाडा, तसेच अहिल्यानगर, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यांच्या काही भागांत अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
विशेषतः लातूर, यवतमाळ, वाशिम, धाराशिव, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये हरभरा, ज्वारी, गहू तसेच द्राक्षे व आंबा अशा फळबागांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. काल गोंदिया येथे अतिवृष्टी व गारपीट झाल्याचेही वृत्त आहे. याशिवाय कोकण पट्ट्यात आंबा उत्पादनावरही प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून रबी हंगामातील नुकसानभरपाई व पीकविमा क्लेमबाबत विचारणा सुरू आहे. मात्र रबी हंगाम 2025-26 साठी राबवली जाणारी पीकविमा योजना ही वैयक्तिक क्लेमशिवाय असून नुकसानभरपाई सरसकट उत्पादकतेच्या (Yield Base) आधारेच ठरवली जाणार आहे. त्यामुळे वैयक्तिक क्लेम केल्यास तो सध्या केवळ पुरावा म्हणूनच ग्राह्य धरला जाईल.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात पंचनाम्याचे निर्देश देण्यात आले असून, इतर जिल्ह्यांतही लवकरच पंचनामे सुरू होण्याची शक्यता आहे. कोकणातील आंबा उत्पादकांच्या नुकसानीसाठी नितेश राणे यांनीही मदतीची मागणी केली आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अवकाळी नुकसानीबाबत काही निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येतो की, ज्यांचे वैयक्तिक नुकसान झाले आहे त्यांनी तात्काळ आपल्या तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून पंचनामा करून घ्यावा. फळबाग धारक शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम दाखल करणे आवश्यक असून, त्यानंतरच फळबाग नुकसानभरपाईची प्रक्रिया होऊ शकते. इतर रबी पिकांसाठी क्लेम सध्या पुराव्यापुरताच उपयुक्त ठरणार आहे.
अवकाळी संकटामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे. हे संकट लवकरात लवकर टळो आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य दिलासा मिळो, हीच अपेक्षा.