महाळुंगे पंचायत समिती गणात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून गेल्या दोन दिवसांत विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर सुरू असल्याचा गंभीर आरोप उमेदवार दिपाली ताई बवले यांनी केला आहे.
“माझ्या गणातील सर्वच गावांतून सतत फोन येत आहेत. अक्षरशः पैशांचा पाऊस पडतोय. जनसेवेचे व्रत घेत विकासाच्या थापा मारणारे आज पैशांच्या गप्पा मारत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे,” असे त्या म्हणाल्या.
दिपाली ताई बवले पुढे म्हणाल्या,
“मी मायबाप जनतेला एकच सांगू इच्छिते – ही जनता धनशक्तीपुढे झुकणारी नाही. 9 तारखेला याचा निकाल सर्वांना स्पष्टपणे दिसेल. माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील मुलीची इतकी भीती का वाटते, हाच खरा प्रश्न आहे.”
“हिम्मत असेल तर सरळ मैदानात या. विचारांची लढाई ही विचारांनीच लढली जाते. आज जरी सर्व यंत्रणा तुमच्या बाजूने असल्या, तरी मायबाप जनता माझ्या बाजूने आहे, हे लक्षात ठेवा,” असा थेट इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.
या आरोपांमुळे महाळुंगे पंचायत समिती गणातील निवडणूक अधिकच रंगतदार होत असून येत्या 9 तारखेला मतदार काय कौल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.