सल्फर लेपित युरियाच्या 40 किलो पिशवीसाठी 254 रुपये कमाल किंमत निश्चित

नवी दिल्ली:
केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी युरियाच्या किमतीबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, सल्फर लेपित युरियाच्या 40 किलो पिशवीसाठी 254 रुपये कमाल विक्री किंमत निश्चित करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत जारी करण्यात आली आहे.

हा निर्णय खत नियंत्रण आदेश (Fertilizer Control Order), 1985 अंतर्गत लागू करण्यात आला असून, ही किंमत उत्पादक, आयातदार, वितरक, डीलर्स तसेच फुल हँडलिंग एजन्सीमार्फत चहा, कॉफी, रबर उत्पादकांसह सर्व शेतकऱ्यांना लागू राहणार आहे.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना युरिया ठराविक आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ₹254 ही कमाल किंमत जीएसटी व इतर केंद्र व राज्य करांचा समावेश न करता निश्चित करण्यात आली असून, लागू असलेले कर विक्रीवेळी स्वतंत्रपणे आकारले जाणार आहेत.

याशिवाय, युरियाच्या पिशव्यांवर पॅकिंग शुल्क आकारण्यासही परवानगी देण्यात आली आहे. डीलर्सना लहान वजनाच्या पिशव्या उपलब्ध करून देण्याची मुभा देण्यात आली असून, त्यासाठी खालीलप्रमाणे अतिरिक्त पॅकिंग शुल्क आकारता येणार आहे:

  • 2 किलो पिशवी: 1.50 रुपये प्रति पॅकिंग
  • 5 किलो पिशवी: 2.25 रुपये प्रति पॅकिंग
  • 10 किलो पिशवी: 3.50 रुपये प्रति पॅकिंग
  • 25 किलो पिशवी: 5 रुपये प्रति पॅकिंग

सल्फर लेपित युरिया हा नायट्रोजनसोबत सल्फरचा थर असलेला सुधारित प्रकारचा युरिया असून, मातीतील पोषक तत्त्वांचे संतुलन राखण्यासाठी तो उपयुक्त मानला जातो. नव्या निर्णयामुळे हा युरिया आता शेतकऱ्यांना 40 किलो पिशवीसाठी 254 रुपयांत उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment