शेतकऱ्यांच्या खात्यात एकत्रित ४००० येणार…?

राज्यातील शेतकरी थकीत असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असतानाच, अलीकडे एक महत्त्वाची बातमी चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांतून शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे हप्ते एकत्रितपणे मिळून थेट 6,000 रुपये खात्यात जमा होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, या चर्चांमागील सत्य वेगळे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता थकीत आहे. हा हप्ता नोव्हेंबर महिन्यात वितरित होणे अपेक्षित होते. या हप्त्यासाठी शासन स्तरावर प्रक्रिया सुरू असून लाभार्थी यादी अंतिम करणे आणि निधी उपलब्धतेसाठी सुमारे 1,850 ते 1,900 कोटी रुपयांची मागणी वित्त विभागाकडे करण्यात आली आहे. मात्र, अद्याप यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय (जीआर) जाहीर झालेला नाही.

हा निधी मंजूर झाल्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा फक्त आठवाच हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता अडकण्याची शक्यता नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे, कारण हा नियमित आणि थकीत हप्ता आहे.

दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची प्रक्रिया वेगळी असून आरएफटी साइन होण्यास सुरुवात झाली आहे आणि लवकरच एफटीओ जनरेट होणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर, साधारणपणे 20 ते 22 फेब्रुवारीनंतर पीएम किसानचा पुढील हप्ता वितरित केला जाण्याची शक्यता आहे.

म्हणजेच, सध्या तरी शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचे हप्ते एकत्रितपणे मिळणार नाहीत. येणाऱ्या काळात प्रथम नमो शेतकरी महासन्मान निधीचा थकीत आठवा हप्ता आणि त्यानंतर वेगळ्या कालावधीत पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता मिळेल, अशी स्पष्ट माहिती समोर आली आहे.

शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत शासन निर्णय आणि खात्रीशीर स्रोतांमधूनच माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Comment