महानगरपालिका निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा केली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. यामुळे संबंधित निवडणूक क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.
या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. 16 जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होईल, 21 जानेवारी ही अंतिम तारीख असेल. 22 जानेवारीला अर्जांची छाननी, तर 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. त्याच दिवशी अंतिम उमेदवार यादी जाहीर होऊन निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.
राज्यातील या निवडणुकांसाठी एकूण 25,482 मतदान केंद्रे असणार असून 2.09 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रत्येक मतदाराला दोन मते द्यावी लागणार आहेत—एक जिल्हा परिषदेसाठी आणि एक पंचायत समितीसाठी.
घोषित कार्यक्रमानुसार मराठवाड्यातील लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव; पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली; तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत.
उर्वरित जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत ओबीसी आरक्षण आणि 50 टक्के मर्यादेचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयात 21 जानेवारीपासून या विषयावर सुनावणी होणार असून त्यानंतर उर्वरित निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या निवडणुकांमध्ये महायुती, महाविकास आघाडी यांच्यासह स्थानिक आघाड्या आणि गट यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. महानगरपालिका निवडणुकांचे निकाल आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणार असल्याचे चित्र आहे.