प्रतिनिधी | कृषी बातमी महेश म्हस्के (पाटील)
राज्यातील 21 जिल्ह्यांमधील 7,201 पेक्षा अधिक गावांमध्ये राबवला जाणारा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2.0) शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात सूक्ष्म सिंचनावर विशेष भर देण्यात आला असून ठिबक सिंचन व तुषार सिंचनासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अनुदान दिले जात आहे.
या योजनेअंतर्गत पाच हेक्टरपर्यंत जमीनधारणा असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्यक्रमानुसार लाभ दिला जातो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान, अल्प व अत्यल्प भूधारक (१ ते २ हेक्टर) शेतकऱ्यांना 80 टक्के, तर २ ते ५ हेक्टर जमीनधारणा असलेल्या सर्वसाधारण शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान देण्यात येते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन व सातबारा उताऱ्यावर सिंचन स्त्रोताची (विहीर, बोअर इ.) नोंद असणे अनिवार्य आहे. किमान एक हेक्टर क्षेत्रापासून अनुदान मर्यादा लागू होते. एकाच क्षेत्रावर सात वर्षांच्या आत पुन्हा ठिबक/तुषार सिंचनाचा लाभ घेता येत नाही, मात्र स्प्रिंकलरसारख्या काही बाबींमध्ये तीन वर्षांनंतर पुन्हा लाभ घेण्याची तरतूद आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून लाभार्थी निवडीनंतर कोटेशन, सातबारा, आधार तसेच विक्रेत्याची बिले व प्रमाणपत्रे अपलोड करावी लागतात. त्यानंतर प्रत्यक्ष मोका तपासणी करून पात्र क्षेत्रानुसार अनुदान वितरित केले जाते.
ही योजना जागतिक बँक व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून राबवली जात असल्यामुळे अनुदानाचे प्रमाण जास्त असून वितरण प्रक्रियाही तुलनेने जलद आहे. अर्जासाठी स्वतंत्र NDKSP पोर्टल उपलब्ध असून, शेतकरी महाविस्तार मोबाईल अॅपच्या माध्यमातूनही अर्ज करू शकतात.
पोकरा 2.0 अंतर्गत यापूर्वी लहान गोदामे, अवजार बँक, शेळीपालन यांसारख्या उपक्रमांनाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येत्या काळात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेल्या उर्वरित घटकांबाबतही माहिती देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.