मुंबई | प्रतिनिधी
राज्यात छतावरील सौरऊर्जा (Rooftop Solar) प्रकल्पांना चालना देण्यासाठी महावितरण (महाडिस्कॉम) मार्फत ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर अनुदान योजना’ राबवली जात असून तीच योजना ‘स्मार्ट सोलर’ या नावाने ओळखली जात आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर योजनेच्या अनुदानासोबतच राज्य सरकारकडून पूरक अनुदान दिले जात आहे. सध्या या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया, पात्रता तपासणी तसेच मंजूर सोलर प्रकल्पांच्या इन्स्टॉलेशनची प्रक्रिया सुरू आहे.
एकच पोर्टल, दोन योजना
रूफटॉप सोलरसाठी अर्ज करण्यासाठी एकच सेंट्रलाईज्ड पोर्टल आहे. लाभार्थी अर्ज भरल्यानंतर त्यांच्या वीज वापरानुसार आणि पात्रतेनुसार अर्जाचे वर्गीकरण केले जाते.
- 100 युनिटपेक्षा जास्त वीज वापर असल्यास अर्ज पीएम सूर्यघर योजनेत समाविष्ट होतो.
- 100 युनिटपेक्षा कमी वीज वापर असल्यास अर्ज स्मार्ट सोलर योजनेत समाविष्ट केला जातो.
पीएम सूर्यघर योजना : केंद्र सरकारचे अनुदान
केंद्र शासनाकडून खालीलप्रमाणे अनुदान दिले जाते –
- 1 किलोवॅट – ₹30,000
- 2 किलोवॅट – ₹60,000
- 3 किलोवॅट – ₹78,000
सरकारने ठरवलेली बेंचमार्क कॉस्ट साधारण ₹50,000 प्रति किलोवॅट आहे. प्रत्यक्ष खर्च 60 ते 70 हजारांपर्यंत जाऊ शकतो.
स्मार्ट सोलर योजना : राज्य सरकारचे पूरक अनुदान
ही योजना फक्त 1 किलोवॅट सोलरसाठी असून 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आहे.
- दारिद्र्यरेषेखालील (BPL) लाभार्थी
- केंद्र अनुदान: ₹30,000
- राज्य पूरक अनुदान: ₹17,500
- एकूण अनुदान: ₹47,500 (95%)
- लाभार्थ्याचा हिस्सा: फक्त ₹2,500 (बेंचमार्क कॉस्टनुसार)
- अनुसूचित जाती / जमाती (SC/ST)
- केंद्र: ₹30,000
- राज्य: ₹15,000
- एकूण: ₹45,000 (90%)
- ओबीसी / खुला प्रवर्ग व इतर
- केंद्र: ₹30,000
- राज्य: ₹10,000
- एकूण: ₹40,000 (80%)
जर प्रत्यक्ष सोलर बसवण्याचा खर्च बेंचमार्कपेक्षा जास्त झाला, तर वाढीव रक्कम लाभार्थ्यांना स्वतः भरावी लागेल.
घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष तरतूद
घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना सोलरसाठी ₹15,000 अतिरिक्त पूरक अनुदान दिले जाते. यासाठी तीन महिन्यांच्या वीज बिलाची अट नाही. घरकुलासाठी वीज जोडणी अर्ज करतानाच महावितरणकडे सोलरसाठी मागणी करता येते.
शासन निर्णय (GR)
या योजनेसंदर्भात 6 ऑक्टोबर 2025 रोजी राज्य शासनाने अधिकृत शासन निर्णय (GR) जारी केला आहे.
अर्ज कसा करायचा?
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे.
- केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर पोर्टलवरून किंवा
- महावितरणच्या रूफटॉप सोलर पोर्टलवरून अर्ज करता येतो.
अर्ज करताना वेगळी योजना निवडण्याची आवश्यकता नसून, प्रणालीद्वारे अर्ज आपोआप योग्य योजनेत वर्गीकृत केला जातो.
आवाहन
मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असले तरी माहितीअभावी अनेक पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत आहेत. 100 युनिटपेक्षा कमी वीज वापर असलेल्या ग्राहकांनी ही संधी नक्कीच वापरावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.